‘झुक् ऽ झुक् ऽऽ झुक् झुक् आगीन गाडी, धुरांच्या च्या रेषा हवेत काढी’ हे बालगीत आपल्या सगळ्यांच्या मनामनात अगदी पूर्णपणे ठसलेले आहे. समस्त मराठी जनांच्या भाव विश्वाची सुरुवात करणाऱ्या अनेक कविता व बालगीतां मध्ये कदाचित हे गीत अग्रस्थानी असेल. तत्समच त्यातील ‘आगीनगाडी’ सुद्धा सर्वांच्या आवडीचा व कुतूहलाचा विषय आहे. एकप्रकारे भारताची भौतिक प्रगती ही रेल्वे च्या बरोबरीने झालेली आहे; अर्थात हा एका वेगळ्या व मोठ्या लेखाचा विषय असू शकतो.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजांच्या ज्या काही चांगल्या पाउलखुणा आपल्याला दिसतात, त्या मध्ये ‘रेल्वे’ ही ‘धरोहर’ कदाचित प्रथमस्थानी असेल.
माझ्या लहानपणी यवतमाळ येथील नॅरोगेज रेल्वे बघायला व त्या स्टेशनवर जायला मला धमाल मजा यायची. तसेच मावशीकडे उन्ह्याळयाच्या सुट्टी मध्ये हिंगणघाट येथे गेल्यानंतर तेथील कापडाच्या गिरणीमध्ये कोळशाची वाहतूक करणारी हातगाडी समान रेल्वे व त्याचे रूळ बघून गंमत वाटायची. याच बरोबर कधी काळी नागपूर येथील रेल्वे स्टेशनवर जायला मिळणे म्हणजे मोठीच पर्वणी असायची. या सर्वांचा एकत्रित विचार करताना आता लक्षात येते ती इंग्रजांची दूरदृष्टी ज्यामुळे रेल्वेचा विस्तार होऊ शकला व तिची अष्टपैलू उपयुक्तता सिद्ध झाली.
जॉर्ज स्टीफन्सन याने निर्माण केलेल्या ‘लोकोमोशन’ नावाच्या इंजिनाद्वारे ब्रिटन मधील प्रथम प्रवासी गाडी स्थान स्टॉकटन ते डार्लींगटन अशी सप्टेंबर १८२९ साली धावली, जर्मनी मध्ये १८३५ साली, सन १८३९ मध्ये हॉलंड व इटलीमध्ये व सन १८४८ मध्ये स्पेन येथे असा युरोप भर रेल्वे चा प्रवास झाला. रेल्वेच्या युरोप मधील उपरोक्त प्रवासानंतर भारतात त्याची निर्माण प्रक्रिया सुरु झाली. भारतात ‘फॉकलंड’ नावाचे रेल्वे इंजिन इंग्लंडहून १८५२ साली आणण्यात आले. त्यानंतर जॉर्ज क्लार्क, जे तत्कालीन मुंबई सरकारचे मुख्य अभियंता होते, त्यांच्या मार्गदर्शना खाली १४ एप्रिल १८५३ ला वाडीबंदर ते ठाणे अशी पहिली आगगाडी धावली. त्यात साधारणतः ४०० प्रवासी होते. एखाद्या दंतकथे प्रमाणे ही घटना होती. ही धावणारी वेगवान आगगाडी बघून लोकं त्यापासून लांब पाळायला लागले होते. असे म्हणतात की त्यामध्ये बसण्याऱ्यांची चांगली तारांबळ उडाली होती. बैलगाडी व तत्सम वाहतुकीची साधनेच वापरात असणाऱ्या भारतासारख्या देशात आगगाडी ही प्रचंड नवलाईची व कुतूहलाची बाब होती. अशा प्रकारे सुरु झालेला भारतातील रेल्वेचा हा प्रवास आज आशियातील सर्वात मोठी रेल्वे व जगातील दुसऱ्या क्रमांकाची रेल्वे ठरला आहे. भारतीय रेल्वे आज आपल्या एकतेची कडी आहे. विविधतेमध्ये एकता हा आपल्या देशाचा स्थायीभाव रेल्वेमध्ये पदोपदी जाणवतो. रेल्वे मार्गाचे आपल्या देशातील जाळे अंदाजे ६३,२२१ की.मी. एवढे आहे.
स्वातंत्र्यपूर्व भारतात रेल्वे अनेक वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून कार्यरत होती. ‘द ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे’ म्हणजे आजची ‘मध्य रेल्वे’ ही त्यातील एक. ब्रिटीश सरकारच्या कार्यकाळात भारतात रेल्वेचा वापर प्रवासी वाहतूकी व्यतिरिक्त अनेक कारणांसाठी ही केला जायचा. कच्च्या मालाची ने-आण बंदराकडे करणे हा एक मुख्य उद्देश तर होताच पण दळणवळणाचे वेगवान साधन म्हणूनही पत्रांची ने-आण करण्यासाठी रेल्वे चा उपयोग होत असे. एवढेच काय तर जोधपूर येथे शहरातील मैला वाहून नेण्यासाठीही ‘स्टिंक एक्सप्रेस’ नावाची गाडी व त्याचे रूळ अस्तित्वात होते. इंग्रजांनी भारतात तीन प्रकारचे रेल्वेरूळ वापरात ठेवले – ब्रॉडगेज, मीटरगेज व नॅरोगेज. त्या त्या प्रदेशांसाठी अनुरूप व सुरळीत वाहतुकीच्या निकषांमध्ये बसणारे ‘ट्रॅक’ (रूळ) निर्माण केलेत. साधारणपणे पर्वतीय क्षेत्रांमध्ये तसेच थोड्या लांबच्या प्रदेशांसाठी ‘नॅरोगेज’ मार्गांचा वापर जास्त होत असे. मुख्य बंदरे तसेच महत्वाची शहरे जोडणाऱ्या मार्गांवर ब्रॉडगेज जास्त प्रमाणात दिसून येते. अर्थात हेच महत्वाचे व सर्वसामान्यपणे मोठ्या प्रमाणात वापरात असणारे गेज आहे. परंतु या तीन प्रकारच्या गेज वापरण्याने सर्वदूर रेल्वेचा प्रसार भारतात झाला. दार्जीलिंगसारखे हिमालयाच्या कुशीत असणारे शहर सुद्धा १८८१ मध्येच रेल्वेच्या नकाशावर आले. याच रेल्वेला मागे १९९९ मध्ये युनेस्कोने ‘सांस्कृतिक ठेवा’ म्हणूनही घोषित केले. आपल्याकडे धावणारी ‘बार्शी लाईट’ ही रेल्वे सुद्धा अशीच ऐतिहासिकच आहे. याच प्रकारात नेरळ ते माथेरान धावणारी गाडी, यवतमाळ ते अचलपूर धावणारी ‘शकुंतला एक्सप्रेस’ या गाड्या मोडतात. इंग्रजांनी कालमानानुसार रेल्वेचा विकास व त्यामध्ये बदल केले आहेत. इंग्रजी वास्तुकले प्रमाणे बांधलेली रेल्वे स्थानके आजही स्थापत्यशास्त्रा चे उत्तम नमुने म्हणून अस्तित्वात आहेत. १८८८ मध्ये आकाराला आलेले ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ म्हणजे वाडीबंदर स्टेशन हे तर मुंबईचा व समस्त मध्य रेल्वेचा मानबिंदू होय.
इंग्रजांनी बांधलेल्या रेल्वे स्थानकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची रचना नैसर्गिकपणे आतील तापमान वातानुकूलीत ठेवण्यास मदत करते. ब्रिटीश कालीन रेल्वेच्या विकासासाठी निरनिराळ्या टप्प्यांचा विचार करताना आणखीही काही गोष्टी नमूद कराव्या लागतील. व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या हार्बर मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी पहिली ई.एम.यु. लोकल, म्हणजे आजच्या सारखी लोकल त्यावरून धावली. याचवर्षी पासून म्हणजे १९२४-२५ पासून रेल्वेचे अंदाजपत्रक राष्ट्रीय अंदाजपत्रकापासून वेगळे केले गेले. याद्वारे रेल्वे च्या अंदाजपत्रकाचे महत्व व त्याचा पसारा लक्षात येतो. भारतीय रेल्वे मधील प्रथम वातानुकूलीत डबा १९३६ साली जी.आय.पी. रेल्वे ने तयार केला. रेल्वेच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा १ जून १९३० रोजी ‘डेक्कन क्वीन’ च्या रुपाने सुरु झाला. मुंबई ते पुणे धावणारी ही वेगवान गाडी ‘रोलर बेअरिंग’ चा वापर केलेली भारतीय रेल्वेची प्रथम डिलक्स गाडी होय. जी.आय.पी. रेल्वेच्या डेक्कन क्वीनने प्रवास करणे हे तेंव्हा प्रतिष्ठेचे लक्षण समजले जायचे.
आजतागायत या गाडीची ‘ती’ प्रतिष्ठा कायम आहे. याच कारणाने तिला ऑक्टोबर २००३ मध्ये आय.एस.ओ. ९००१-२००० हे प्रमाणपत्र मिळाले. भारतीय रेल्वेतील ‘भोजनयान’ हा डबा असणारी ही एकमेव गाडी आहे. बोरघाटातून पावसाळ्यामध्ये प्रवास करताना ‘डेक्कन क्वीन’ च्या भोजनयानात बसून गरम कॉफीची ‘सीप’ घेण्यासारखा दुसरा आनंद कदाचितच असेल.
ब्रिटीशकालीन रेल्वे मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय दर्जाची आसनव्यवस्था असायची. अर्थातच द्वितीय व तृतीय दर्जांच्या पद्धतीला वसाहतवादी विचारसरणीचा वास यायचा. या मुळे कालांतराने आजच्या भारतीय रेल्वे मध्येआसनव्यवस्था वातानुकूलीत २ टायर, वातानुकूलीत ३ टायर, शयनयान, खुर्चीयान अशाप्रकारे विभागलेली आहे. वर्तमानात आपण एवढे पुढारलेले आहोत की कित्येक आफ्रिकन व आशियाई देशांना भारतातर्फे रेल्वेचे डबे तयार करून पाठविले जातात. भारतामध्ये आपण पूर्णतः वातानुकूलीत ‘पँ ट ॒ री कार’ म्हणजेच स्वयंपाक करण्यासाठीचा डबासुद्धा उत्तमरीत्या बनवितो. एवढेच काय स्वातंत्र्य मिळाल्या नंतरची कित्येक वर्षे रेल्वेचे इंजिन आपण ब्रिटन मधून आयात करायचो. परंतु आता ‘भारत हेव्ही इलेक्ट्रिकल लिमिटेड’ सारखी सरकारी यंत्रणा उत्तम दर्जाचे इंजिन तयार करते. ते सुद्धा आपण बांगलादेश व श्रीलंकेला निर्यात करतो. पूर्वी कोळशावर चालणारी इंजिने असायची. त्यामुळेच ‘आगगाडी’ ही शब्दयोजना रूढ झाली. पण कालांतराने त्यांची जागा हाय स्पीड डिझेलचा वापर करणाऱ्या डिझेल लोको मोटिव्हने घेतली. त्यांचा कारखाना चित्तरंजन व वाराणसी येथे आहे. आता तर अद्ययावत विद्युतीय इंजिन वर सांगितल्याप्रमाणे भारतातच तयार होतात. याचमुळे आपण वेगवान गाड्या सुरु करू शकलो. ‘डेक्कन क्वीन’ प्रमाणे एक आणखी प्रतिष्ठेची गाडी भारतीय रेल्वे ने १७ मे १९७२ रोजी ‘राजधानी एक्स्प्रेस’ च्या रुपाने सुरु केली. भारतातील पहिले डिझेल इंजिन त्यासाठी वापरण्यात आले. त्यावेळी मुंबई ते दिल्ली हा १३८८ कि.मी. चा प्रवास या गाडीने १९ तास ५ मिनिटांमध्ये पूर्ण व्हायचा. त्या काळात ही गती विक्रमी होती. आता तर शताब्दी एक्स्प्रेस, ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस अशा वेगवान गाड्या भारतीय रेल्वे मध्ये निरंतर धावत आहेत. रेल्वे च्या आधुनिकीकरणाचा आणखीन एक टप्पा ‘पॅलेस ऑन व्हील’, ‘रॉयल ओरीयंट एक्स्प्रेस’, ‘डेक्कन ओडिसी’ यांच्या सारख्या गाड्यांमध्ये बघायला मिळतो. खास देशी व विदेशी अशा दोन्ही प्रकारच्या पर्यटकांना ध्यानात ठेवून त्यांची अंतर्गत मांडणी व सजावट केलेली आहे. पंचतारांकित सुविधा त्या गाड्यांमध्ये उपलब्ध आहेत. भारत भ्रमणासाठी याहून दुसरा उत्तम मार्ग कदाचित नसेल. अधुनिकीकरणाच्या याच टप्प्यावर ‘गरीब रथ एक्स्प्रेस’ या गाडीचाही उल्लेख करावा लागेल. भारतीय रेल्वेचे अत्याधुनिक ‘स्वरूप’ व रचना त्यावरून लक्षात येते. मुख्यतः खेड्यापाड्यांमध्ये राहणाऱ्या सामान्य भारतीय नागरिकांना केंद्रस्थानी मानून या गाडीची रचना केलेली आहे. त्यामुळे कमीतकमी पैशांमध्ये वातानुकूलीत प्रवास करण्याची सुविधा प्राप्त झालेली आहे. अशाप्रकारे जीवनरेखा एक्स्प्रेस, ‘भारत विशेष गाडी’ या सारख्या खास विषयांसाठी व सेवेसाठी धावणाऱ्या गाड्यांचा उल्लेख करावा लागेल.
भारतीय रेल्वेची नवीनी करणाची व विस्ताराची प्रक्रिया तर अविरत सुरूच असते. खंडाळा ते कर्जत हा बोरघाट व कसारा ते इगतपुरी या थळघाटातून प्रवास करतांना मला इंग्रजांचे कौतुक वाटायचे. कारण, मनुष्यच काय प्राणी सुद्धा संचार करायला घाबरतील अशा खडतर व उंचसखल भागात इंग्रजांनी रेल्वे चे रूळ टाकले आहेत. नवीन स्थानकांची निर्मिती केली. एवढेच नव्हे तर त्यासाठी पर्वत च्या पर्वत पोखरून प्रचंड मोठे बोगदे तयार केले. खंडाळा ते मंकी हिल हा २,१०० मिटर्स चा बोगदा हा तेंव्हाचा सर्वात मोठा बोगदा होय.
परंतु भारतीय माणूस व आपले स्थापत्य-विज्ञान सुद्धा कुठेच मागे नाही. प्रचंड कठीण व खडतर भागांमध्ये रेल्वे चा विस्तार करून आपण हे सिद्ध केलेले आहे. कोकण रेल्वे चा करबुडे येथील बोगदा हा तब्बल ६.४ कि.मी. लांबीचा आहे. एवढेच नाही तर दऱ्याखोऱ्यांमधून रेल्वेचे रूळ टाकताना आपण एक वेगळाच दर्जा सिद्ध करू शकलो. कोकण रेल्वे वर चा पानवल (रत्नागिरी जवळ) येथील पूल साधारणतः ६५ मीटर उंचीवर निर्माण झालेला आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पुलां पैकी एक म्हणून त्याची गणना होते. अशाच प्रकारे काश्मीर खोऱ्यात रेल्वेची मुहूर्तमेढ आपण केलेली आहे. त्यासाठी जम्मू ते कटरा (वैष्णोदेवी) हा मार्ग तर पूर्ण सुद्धा झालेला आहे. अशा प्रकारे दार्जीलिंग नंतर साधारणतः सव्वाशे वर्षांनी हिमालयाचे दुसरे टोक रेल्वेचा भार पेलण्यास सिद्ध होते आहे. काश्मीर मध्ये रेल्वेचा प्रसार होण्याने देशाच्या एकता व अखंडतेला चालनाच मिळेल. तसेच भारतीय रेल्वेच्या वाटचालीमध्ये तो मानाचा शिरपेच असेल. देशातील शहरांतर्गत वाहतुकीसाठी सुद्धा रेल्वे तर्फे विविध उपाय योजना केल्या जातात. कोलकाता शहरांतर्गत वाहतुकीसाठी आरंभ झालेली भुयारी रेल्वे “मेट्रो रेल्वे” तसेच दिल्ली मध्ये नुकतीच सुरु झालेली “मेट्रो रेल्वे” उदाहरणादाखल सांगता येतील. कोकण रेल्वे महामंडळाच्या “स्काय बस” या नमुन्याला तर अमेरिकन सरकारचे पेटंट प्राप्त झालेले. (फेब्रुवारी २००४)
भारतीय रेल्वेमध्ये १९८६ मध्ये संगणकीकृत आरक्षण व्यवस्था नवी दिल्ली येथे सुरू झाली होती. त्यानंतरच्या कालावधीत अनेक लहान स्थानकांपर्यंत संगणकाद्वारे आरक्षण उपलब्ध होऊ शकते. नुकतेच रेल्वे मध्ये तिकिटांच्या वितरण व्यवस्थेसाठी विकेंद्रीकरणाच्या धोरणांतर्गत विविध संस्था व एजेंटस् चा आधार घेण्याचे ठरलेले आहे. मुंबई सारख्या महानगरात प्रवास करण्यासाठी बस व रेल्वे या एकत्रित वाहतूक व्यवस्थे मध्ये प्रवेश मिळायला “गो मुंबई” यांसारख्या “स्मार्ट कार्ड” चा (एक प्रकारचे तिकीट)) उपयोग होतो आहे.
भारतीय रेल्वेची ख्याती देशाबाहेरही पसरली आहे. राईट्स (रेल इंडिया टेक्निकल अँड एकोनोमिक्स सर्विसेस) व ईरकॉन (इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनी) सारख्या संस्था इराण, इंडोनेशिया तसेच अनेक आफ्रिकी देशांना रेल्वे व्यवस्थे विषयी सल्ला व मार्गदर्शन पुरवतात व त्यांच्या उभारणीसाठी मदत करतात.
माझ्या लहानपणी पाठ्यक्रमात असणाऱ्या या कवितेच्या ओळी “आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे”, येथे वेगळ्या प्रकारे ऊर्धृत कराव्याश्या वाटतात – “आचंद्र सूर्य नांदो, भारतीय रेल्वेची प्रगती आणि जडण घडण.”
चाणक्य मंडळ परिवार (मासिक), पुणे /
दिवाळी अंक : नोव्हेंबर-डिसेंबर २००८ /
वर्ष चौथे, अंक अकरावा / पान ६५, ६६ आणि ७८ मध्ये प्रसिध्द

फारच छान लेख. प्रीतीश पंडित हे एक अत्यंत चोखंदळ व्यक्तिमत्व असून त्यांना मी लहान पणा पासून ओळखतो. एखाद्या विषयाच्या खोल गाभ्यात शिरून त्याचे विश्लेषण करण्याचे अवघड काम ते अगदी सहजपणे करतात. त्यांचे मराठी वरील प्रभुत्व खूप छान आहे. त्यांच्या ब्लॉग मुळे मराठी वाचकांना चांगल्या articles ची मेजवानीच मिळणार आहे. My best wishes to Pritish. Good initiative.
क्या बात है प्रीतिश. फ़ारच छान लिहिलय. अभिनंदन.
धन्यवाद पराग