बदलता प्रवास
‘हम लोग’ आणि ‘ बूनियाद’ या दूरदर्शनवरील सोप ओपेरांचा म्हणजे सिरीयलचा सुरू झालेला प्रवास आज फार वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे. हल्लीच्या डिजिटल मीडियाच्या जमान्यात वेब सिरीज, ‘स्ट्रीमिंग लाईव्ह’ द्वारे प्रसारित होणारे कार्यक्रम ‘टॉक शो’, रियालिटी शो या बरोबरीने विविध भाषिक मालिकांचे स्थान कायम आहे. याचमुळे विविध चॅनेल्स आणि त्यावर चालणारे विविधरंगी कार्यक्रम यांची सदोदित भरमार होत असते. या सर्वांमध्ये दूरदर्शनची राष्ट्रीय वाहिनी आणि त्याचे मराठी अपत्य सह्याद्री वाहिनी आपले अढळ स्थान जनमानसात आजही रुजवून आहेत. याच सह्याद्री वाहिनीवर नवीन मालिका सुरू आहे ‘आमची अनन्या’…

अनन्या: मुख्य पात्र
अनन्या एक खट्याळ तरीही खूप समजदार, स्मार्ट, आत्मविश्वास पूर्ण, अशी मुलगी आहे ती कुठलेही प्रसंग लीलया हाताळणारी असते. याचमुळे तिची घरातील उपस्थिती आणि वावर हा नेहमीच आल्हाददायक आणि आनंददायक असतो. घरातील लहान मोठ्या प्रसंगांना आपल्या समयोचित आणि आशावादी वृत्तीनेच अनन्या सामोरी जाते आणि अशा सर्वच प्रसंगातून संपूर्ण कुटुंबाला आनंदी ठेवते.
संपतराव अभ्यंकर कुटुंब
ही कथा संपतराव अभ्यंकरांच्या, जे आर्मीमध्ये कर्नल म्हणून निवृत्त झालेले आहेत, यांच्या कुटुंबातील आहे. याच शिस्तप्रिय संपतराव अभ्यंकरांच्या घरामध्ये घडणाऱ्या गोष्टींची मालिका ‘आमची अनन्या’ रंगवते आणि फुलवते. थोडाफार ग्रामीण बाज असणारी, शहरी फॅमिली आहे, या संपतराव अभ्यंकरांची.
लक्ष्मी आजीचे महत्त्वाचे पात्र
कथानकामध्ये एक महत्त्वाचे मध्यवर्ती पात्र आहे अनन्याच्या लक्ष्मी आजीचे. संपतराव अभ्यंकरांच्या पत्नीची म्हणजेच लक्ष्मी आजीची भूमिका लिलया पार पाडली आहे, इरावती लागू या अनुभवी आणि हसतमुख अभिनेत्रीने. मराठी रंगभूमीवर आपला वेगळा ठसा उमटवणारी अशी ही अभिनेत्री आहे.

हलकीफुलकी कौटुंबिक कथा
आमची अनन्या ही एका परिपूर्ण कुटुंबाची हलकीफुलकी कथा आहे. आजकाल चालणारे सर्वच सिरीयल हायपर ड्रामा, मेलो ड्रामा या वळणाचे असतात. त्यामानाने ‘कभी खुशी कभी गम’ असा भाव जपणारे घरगुती वातावरणात चाललेले हे कथानक नक्कीच प्रेक्षकांना भावते. यात सासु सुनेचे वाद आहेत, पण अगदीच लवकर संपणारे, शरीरावर मोरपीस फिरवून निघून जावे तसे. आरडाओरडा नाही, रडा रड नाही असे हे कथानक आहे. संपतराव अभ्यंकर यांच्या कुटुंबात पॅरिसहून आलेली ‘पॅरी’ मावशी आहे. तसेच गजोधर हा विनोदी पण संवेदनशीलता जपणारा नोकरसुद्धा आहे. तसेच एक ‘फुकटचा मामा’ आहे. इतरही अनेक व्यक्तिरेखा आहेत.
सर्जनशीलतेचे दर्शन
आमची अनन्यामध्ये ‘सखी गृहलक्ष्मी’ सारख्या स्पर्धा सुद्धा आहेत. अशा प्रकारे आमची अनन्या चे कथानक परिपूर्ण वाटते. मालिकेतील शीर्षक गीतात हातात दिवा धरून नाचणारी नर्तकी आणि नटराजाची मूर्ती दिग्दर्शकाच्या कौशल्याची प्रचिती देतात. मालिकेचे दिग्दर्शन अश्वनी गदो या अनुभवी आणि होतकरू दिग्दर्शकाने सांभाळले आहे. अनेक हिंदी आणि गुजराती मालिकांच्या दिग्दर्शनाचा दीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पराग पिंपळे हे सहाय्यक दिग्दर्शक आहेत. बिट्टू मर्चंट यांनी संगीताची बाजू उत्तम सांभाळली आहे. रागिनी दारवटकर यांच्या आवाजातील शीर्षक गीत श्रवणीय आहे. सह्याद्री वाहिनी वरची मालिका असल्याने डॉल्बी स्टिरिओ फोनिक ध्वनीची गरज पडत नाही. यामुळे ध्वनी तंत्रज्ञाची डोकेदुखी नसते.

‘आमची अनन्या’ ने साधेपणा हाच सुखी आणि यशस्वी जीवनाचा मूलमंत्र असल्याचे अधोरेखित केलेले आहे. साधेपणाच्या करीष्म्याने ही, जीवनात आनंद फुलवता येतो हेच या मालिकेचे सूत्र आहे, आणि आजच्या समाजाचे वास्तव आहे
