अमित कुमार हे नाव भारतीय फिल्म संगीताच्या सुवर्णकाळाशी अतूटपणे जोडले गेले आहे. वडील किशोर कुमार यांच्या प्रभावळीत वाढलेल्या अमित कुमार यांनी स्वतःच्या आवाजाच्या वैशिष्ट्यांनी आणि भावस्पर्शी गाण्यांच्या सादरीकरणाने संगीतप्रेमींच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. त्यांच्या सांगीतिक प्रवासाला बॉलिवूडच्या ‘गोल्डन एरा’मधील खास ओळख आहे. आज आपण त्यांच्या या अद्वितीय प्रवासाचा आढावा घेणार आहोत, ज्याने भारतीय फिल्म संगीताच्या परंपरेत नवा ठसा उमटवला.
गीत-संगीत: शाश्वत सत्य
‘गाणं म्हणजेच गीत आणि बरोबरीने संगीत, हे शाश्वत असतं, आपणच अपूर्ण असतो’ असे मध्यंतरी कुठेतरी वाचनात आले होते. आता अमित कुमार यांच्या गायक म्हणून असणाऱ्या कारकिर्दीचा विचार करताना याचा अनुभव येतो.
अजरामर प्रवास आणि ‘गोल्डन एरा’

अमित कुमार यांचा फिल्मी प्रवास वडिलांप्रमाणे तसा दीर्घकालीन नव्हताच, पण जो होता तो नक्कीच अजरामर झालाय. तसे बघायला गेलो तर तो कालखंड भारतीय सिनेमाच्या गीत संगीत विषयक बाबतीत ‘गोल्डन एरा’ होता. संवेदनशील मनाला जोडणारे, भावस्पर्शी संगीत, जे सामाजिक जाणीवा जपणारेही होते आणि जीवन समृद्ध, परिपूर्ण करणारेही होते. असा हा काळ होता.
संगीताचा सुवर्णकाळ
साधारण सत्तरच्या दशकापासून अगदी नव्वदीच्या दशकाला जोडणारा, म्हणजे साधारण दोन दशकांहून अधिक मोठा हा कालखंड होता. तो जमाना असा होता की मुकेश पण होता आणि मोहम्मद रफी पण होता, किशोर कुमार तर राजेश खन्ना यांच्या सुपरस्टारडममुळे ‘टॉप गियर’ मध्ये होता. यांच्या बरोबरीने येसूदास, भूपेंद्र आणि शैलेंद्रसिंग हे टॅलेंटेड नवोदित गायक पण उपलब्ध होते.
आर.डी. बर्मन आणि अमित कुमार
अशा वेळी आर डी बर्मनला अमित कुमारला आणायचे होते. याबद्दल खुद्द किशोर कुमारनेच विचारले असता, पंचमदांनी उत्तर दिले की ‘दादा, प्रोडूसर के पास आपका बजेट नही है, इसीलिए नये किसी गायक की जरूरत है’. त्यानंतर मात्र असे झाले की किशोर कुमारचा चार्म आणि आवाज हवा, पण किशोर कुमार नको बजेटमुळे, तर मग हमखास अमित कुमारचे नाव पुढे यायचे.
संगीताचा वारसा
अमित कुमारचा आवाज तसा मधुर आणि श्रवणीय तरीही भारदस्त असा होता. त्याची आई रुमा ठाकूरता हीच्याकडूनच त्याला संगीताचा वारसा मिळालेला होता. ती बंगाली संगीताचे एक नावाजलेले व्यक्तिमत्व होती. त्यामुळे त्याचे बालपण ज्या कलकत्त्यात गेले, तिथेच त्याला संगीताचे प्राथमिक धडे घेता आले.

वडिलांचे मार्गदर्शन
वडील किशोर कुमार यांचे तर अमित कुमारला आकर्षणही होते आणि मार्गदर्शन सुद्धा होते. त्यामुळे त्याच्या कारकीर्दच्या सुरुवातीच्या काळात अमित कुमार आणि किशोर कुमार यांची ‘बाप बेटे की जोडी’ लाईव्ह म्हणजे, प्रत्यक्ष ‘स्टेज शो’ चे कार्यक्रम करायची. त्यावेळेस किशोर कुमारचा अष्टपैलू आवाज, उत्साह, हजरजवाबीपणा, विनोदी स्वभाव आणि टॅलेंट यांच्याबरोबरीने अमित कुमारचे उभरते टॅलेंट आणि आवाजातील वेगळेपणा हे कार्यक्रमाचे मानबिंदू असायचे.
भावस्पर्शी गाणी
व्यक्तिशः अमित कुमार हा स्वतः त्यांच्या रोमँटिक युगलगीते आणि भावस्पर्शी, आत्मभान जपणाऱ्या गाण्यांबरोबरच तरल, हळुवार गाण्यांसाठीही प्रसिद्ध होता. त्याची गाणी ही प्रेक्षकांना हळूच स्पर्श करून जायची आणि मनोमन आवडायची.
स्मरणीय गाणी
१९७६चे ‘बालिका वधू’ मधील ‘बडे अच्छे लगते हो, यह धरती, यह नदीया..’ हे गाणे असो किंवा त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी गायलेले ‘जीवा’ मधील ‘रोज रोज आखों तले..’ हे गाणे असो, मेलोडी आणि रिदम कमी असूनही, त्यातील भावबंध आणि शब्दरचनेमुळे अजरामर झाली आहेत.
‘लव्हस्टोरी’ची यशोगाथा
१९८१ मध्ये कुमार गौरव आणि विजयता पंडित यांचा ‘लव्ह स्टोरी’ हा सिनेमा आला. त्या सिनेमात कुमार गौरवने गायलेली सर्वच गाणी अमित कुमारच्या वाट्याला आली. ‘लव्हस्टोरी’ सुपरहिट झाला, त्या बरोबरीने घराघरात पोहोचला अमित कुमारचा आवाज. याच सिनेमासाठी त्याला त्यावर्षीचे सर्वोत्कृष्ट गायकासाठी असलेले फिल्मफेअर पारितोषिक मिळाले.
हिट गाण्यांचा सिलसिला
‘तेरी कसम’ मधील ‘यह जमीन गा रही है…’, ‘तेजाब’ मधील ‘एक, दो, तीन…’ आणि ‘कुर्बानी’ मधील ‘लैला हो लैला…’ अशी अनेक गाणी सुपरहिट झाली. ‘जवानी’ मधील ‘तू रुठा तो…’ हे युगलगीत आजही लोकांच्या मनावर राज्य करते.

आर.डी. बर्मन आणि अमितचा संगम
मोझार्टच्या चाळिसाव्या सिम्फनीवर आर.डी. बर्मन यांना रचना करायची होती. पण सलील चौधरी यांनी ती आधीच वापरली असल्याचे लक्षात आले. मग पंचमने तीच रचना अमित कुमारकडून ‘ऐसे ना मुझे तुम देखो…’ मध्ये गाऊन घेतली आणि ती अजरामर केली.
अजरामर संगीताचा ठसा
असा अमित कुमार यांचा सांगीतिक प्रवास आहे, जो आजही मनामनात घर करून आहे. अमित कुमार यांच्या मधुर आवाजाने आणि सांगीतिक योगदानाने बॉलिवूडमध्ये एक वेगळा अध्याय लिहिला आहे. त्यांच्या गाण्यांनी श्रोत्यांच्या मनाला हळुवार स्पर्श केला आणि आजही त्यांच्या सुरांची गोडी अजरामर आहे. त्यांच्या अद्वितीय गायकीचा वारसा भारतीय संगीतप्रेमींसाठी कायम प्रेरणादायी राहील. त्यांच्या कारकिर्दीची ही सुरेल कथा मनात कायम स्वरूपात रुंजी घालत राहील.
