2024 महाराष्ट्राच्या निवडणुकीचा अन्वयार्थ

ऐतिहासिक पार्श्वभूमी

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून, आजपर्यंतच्या सर्वच निवडणु‌कांमध्ये, या निवडणुकीचे महत्व आलेल्या निकालामुळे, वेगळेपणाने अधोरेखित होते. त्यासाठी काही गोष्टी विशेषत्वाने नमूद कराव्या लागतील. महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या राजकारणाचा आणि बरोबरीने समाजकारणाचा विचार करताना काही गोष्टी ठळकपणे लक्षात येतात.

एकतर असे आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून साधारणपणे सुरुवातीची पाच दशके महाराष्ट्रावर काँग्रेसचे एकछत्री राज्य होते. अपवाद होता फक्त १९७८ पासून च्या दीड -पावणेदोन वर्षांचा. तेंव्हा काँग्रेसमधून फुटुन पुलोद ची स्थापना करणारे शरद पवार राज्याचे मुखामंत्री झाले. त्यानंतर फक्त १९९५ पासून, पुढील साडेचार वर्षे, प्रथमतः काँग्रेसेतर सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले.

भाजपचा उदय

वरील अपवाद वगळता २०१४ च्या निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसचाच वरचष्मा राहिला आहे. हे चित्र पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ झालेल्या भारतीय जनता पक्षाने बदलले. याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणातही, राष्ट्रीय स्तरावर झाल्याप्रमाणे एक नवीन अध्याय सुरु झाला. त्यानंतर झालेल्या सलग तीन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने तीन आकडी आमदार विधान- सभेत निवडुन आणलेत.

१९९० नंतर कुठल्याही एका पक्षाला महाराष्ट्रात ही किमया करता आली नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रातील राजकारणाचा आता मध्यवर्ती खांब म्हणून दृढ झाली. अशाप्रकार भारतीय जनता पक्ष आता फक्त उजव्या विचारसरणीचा पक्ष न राहता मध्यममार्गी पक्ष म्हणून उदयास आला.

पक्ष विस्तार आणि नेतृत्व

शेतकरी संघटनेतुन आलेले सदाभाऊ खोत, दलित चळवळीतुन आलेले गोपीचंद पडळकर यांचे बरोबरच प्रविण दरेकर, प्रसाद लाड, श्रीमती चित्रा वाघ यांच्यासारखे नेते, भाजपचे नेते मंडळी झाल्याने ही बाब प्रकर्षाने मांडता येते.

या मुद्द्यांचे प्रत्यंतर नुकत्याच सर्वदूर झालेल्या भाजपच्या विजयाने, विस्ताराने आणि आलेल्या आमदारांच्या संख्येने येते. एका अर्थाने २०२४ची विधानसभा निवडणूक ही भाजपचे महत्व आणि स्थान महाराष्ट्राच्या राजकारणात स्थिरस्थावर करणारी ठरली.

पारंपरिक विरोधकांचा पराभव

भाजपने या निवडणूकीत काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) या परंपरागत प्रति- स्पर्ध्यांबरोबरच आता नवीन विरोधक उबाठा शिवसेनेचा धुव्वा उडवतानाच, अचलपूरात प्रहारचे बच्चु कडू आणि वसई-विरार या पट्‌यात हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षालाही धूळ चारली.

विकासाची नवी दिशा

या निवडणूकीने महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास नव्या दमाने सुरु होईल. ‘महाराष्ट्र हे राज्य ट्रिलियन डॉलर इकोनॉमीचे राज्य होईल’ ही देवेंद्र फडणवीस यांची घोषणा आहेच, याकडे गांभीर्याने आणि दमदार‌पणे वाटचाल सुरु होईल. यामूळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते आहेतच, पण ही बाब परत एकदा ठळकपणे आणि प्रकर्षाने पुढे आली आहे.

या निवडणुकीने त्यांना लोकमान्यता आणि राज्यमान्यता दोन्हीही मिळाल्यात. राष्ट्रीय राजकारणातही देवेंद्र फडणवीस यांचे महत्व वाढून त्यांना अधिक महत्त्वाचे,तसेच आदराचे स्थान प्राप्त होईल.

शरद पवार यांचे राजकीय प्रभाव कमी होणे

या निवड‌णूकीचा दुसरा अन्वयार्थ असा काढता येईल की महाराष्ट्राचे मातब्बर,मुरब्बी अशी ओळख असणारे ज्येष्ठ नेते, मराठा स्ट्रॉंग मॅन शरद पवार यांच्या राजकारणाला आता घरघर लागली आहे.

दोनशे अठ्ठ्यांशी सदस्य‌संख्या असलेल्या विधानसभेत, गेली सहा-सात दशके, महाराष्ट्र आणि देशपातळीवर राजकारण करणाऱ्या नेत्यास साधी सन्मानजनक सदस्यसंख्या पण निवडुन आणता आली नाही. त्यांचे फक्त दहा आमदार निवडून आलेत.

२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांना युतीतुन फोडून मुख्यमंत्री करण्याची खेळी खेळणाऱ्या आणि त्यानंतरची अडीच वर्षे सत्ता राबवणाऱ्या पवारांसाठी ही मोठी नामुष्कीची बाब आहे. आतातर त्यांच्या घरातच उभी फूट पडली आहे.

एवढी वर्षे अकलूजचे मोहित पाटील घराणे, बीडचे बदामराव पंडित घराणे आणि मुंडे काका-पुतणे यांच्या मध्ये आपापसात वाद पेटवणारे शरद पवार आता आपल्याच पुतण्याच्या अंतर्बाह्य विरोधाने अक्षरशः हबकले आहेत. त्यांचे निष्ठावंत राहिलेले दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे याचबरोबर छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल सारखे लोक त्यांना सोडून गेल्यावर ते कमालीचे विचलित झाले आहेत. एका अनुभवी आणि पॉवरफुल राजकारण्याची आयुष्याच्या उतार वयात अशी स्थिती होणे हे निश्चितच दयनीय आहे.

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची अधोगती

या निवडणुकीचा आणखीन एक महत्त्वाचा अन्वयार्थ असा आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे सर्वेसर्वा असणारे उद्धव ठाकरे यांचा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेचा १९९० पासून आजपर्यंत सुरू असलेला उर्ध्व प्रवास, आता थोडा निम्न स्तरावर उतरला आहे.

मोठ्या विश्वासाने बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली होती. त्या विश्वासाला अपात्र ठरण्याची कृती उद्धव ठाकरे यांच्याकडून मागील १० वर्षात वारंवार झालेली आहे. यामुळे आज त्यांची आमदार संख्या २० या निचांकी पातळीवर आल्याचे बघायला मिळते.

हिंदू वोट बँकेची प्रभावीता

अगदी सुरुवातीला जेव्हा १९९० मध्ये शिवसेना आणि भाजप युती झाली होती. त्यावेळेस शिवसेनेला १७१ आणि भाजपला ११७ जागा, २८८ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत लढायला मिळाल्या होत्या. तेव्हापासूनचा त्यांचा प्रवास आज तेहतीस वर्षांनी निचांकी पातळीवर पोहोचला आहे. हे निश्चितच त्यांच्या चुकीच्या राजकारणाचे द्योतक आहे. एकेकाळी मनोहर जोशी, वामनराव महाडिक, प्रमोद नवलकर, दिवाकर रावते,सुधीर जोशी यांसारखे दिग्गज शिवसेनेच्या राजकारणात वावरायचे त्याऐवजी आता विविध आरोप असणारे नेते त्यांच्या अवती भवती असतात हेच त्यांच्या अधोगतीचे कारण असू शकते. या निवडणुकीच्या निकालांतुन आणखीन एक गोष्ट अधोरेखित झाली, ती म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदा एक ‘हिंदू वोट बँक’ तयार झाली त्यामुळे शहरी, निमशहरी, ग्रामीण याच बरोबरीने आदिवासी आणि आरक्षित अशा सर्वच मतदारसंघांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना विजय मिळवता आला. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील दहाच्या दहा जागा महायुतीने जिंकल्या ही बाब दिशादर्शक ठरते. भाजपाच्या बरोबरीने महायुतीतील घटक पक्षांनाही म्हणजे शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही घवघवीत यश मिळाले, ही हिंदू वोट बँक आणि एकगठ्ठा मतदान झाल्याची पावतीच आहे. या निवडणुकीत भाजपा आणि मित्र पक्षांनी घवघवीत यश मिळवून महाराष्ट्राच्या भूमीत ठामपणे पाय रोवण्याच्या घटनेला आणखीन एक आयाम आहे. या भूमीला लोकमान्य टिळकांचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा मिळालेला आहे. क्रांतिकारकांचे अध्वर्यू आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, यासारखे क्रांतिकारकांचाही वारसा मिळाला आहे. त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यारे छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील वारसा मिळालेला आहे. अटकेपार झेंडे रोवणाऱ्या पेशव्यांचाही वारसा या भूमीला मिळाला आहे, त्यामुळेच महाराष्ट्राच्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांनी मिळवलेले लक्षणीय यश खूप मोठे आहे आणि त्याचा आयाम त्यापेक्षा ही मोठा आहे.

 

Related posts

Leave a Comment